Ad will apear here
Next
स्वप्ननगरीतील ज्ञानपीठ - जळगावचे एम. जे. कॉलेज
जळगावच्या एम. जे. कॉलेजचा अमृतमहोत्सव नुकताच पार पडला. ‘नॉलेज इज पॉवर’ हे आपले ब्रीद सार्थ करणाऱ्या भारतामधील या आदर्श शिक्षण संस्थेचा धावता परिचय करून देत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर.... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
...................
‘शिवशाही’च्या शयनयानातून रात्रीचा प्रवास सुरू झाला. यानाची चाकं जमिनीला चिकटून जात असल्यामुळे पाठीला रस्त्याचा नकाशा कळत होता. मधूनच डुलकी आणि मध्येच जाग येत होती. त्यातच स्वप्न सुरू झालं. महाभारतात, पाण्याखाली विशाल नगरं वसलेली असतात अशी कथा आहे. भीम त्यातल्या एका नगरात जातो. तिथे त्याचा उत्तम पाहुणचार होतो, वगैरे. मीही बघता बघता तशाच एका नगरात प्रवेश केला. नगरीचं नाव होतं ‘जलनगर.’ सोबत एक मित्रही होता. एका छोट्या यानानं आम्हाला नगरातून हिंडवत ‘मूळजी जेठा महाविद्यालय’ नावाच्या एका विद्यानगरीत नेऊन सोडलं. स्वागतासाठी तिथली काही भद्र मंडळी हजर होती. सकाळचं ‘आन्हिक’ उरकण्यासाठी त्यांनी एका अद्ययावत निवासस्थानी नेऊन सोडलं.

प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णीआवरून झाल्यावर काही प्राध्यापक मंडळी न्यायला आली. प्रथम प्राचार्यांना भेटायचं होतं - डॉ. उदय कुलकर्णी. त्यांचा विषय ‘जिऑलॉजी.’ माझाही विषय ‘पुरातत्त्व’ असल्यामुळे त्यात ‘जिऑलॉजी’चा अभ्यास झाला होता. लगेच त्यांच्याशी ‘जवळीक’ निर्माण झाली. मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. विद्या पाटील सोबत होत्या. त्या म्हणाल्या, ‘आमच्या मराठी मंडळाचं उद्घाटन व्हायचं आहे. आला आहात, तर तुमच्या हस्ते करू. त्यानंतर विद्यार्थ्यांबरोबर साहित्य, वाचन-संस्कृती या विषयांवर गप्पागोष्टी होतील.’ हे तर आवडीचे विषय. ‘ग्रंथसखा वाचनालय, बदलापूर’चे श्याम जोशी बरोबर होतेच. ते तर त्यातले दर्दी जाणकार. चहापाणी करून थेट एका मोठ्या सभागृहात गेलो. मुलांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. 

मराठी मंडळाचे उद्घाटन

हर्षल पाटील 'नली' सादर करताना....तिथली जागा गच्च भरलेली होती. मुलांच्या चेहऱ्यावर कुतूहल, उत्सुकता दिसत होती. त्यामुळे त्यांना ‘बळंच’ बसवलेलं नसावं! हल्ली साहित्यिक कार्यक्रमांना एवढी गर्दी बघायची सवय नाही. आगत-स्वागत झाल्यावर ‘मंडळा’चं उद्घाटन झालं. आम्ही दोघं वक्ते ठरलेल्या विषयांवर बोललो. गेली ४०-४५ वर्षं साहित्य क्षेत्रात विविध प्रकारचं काम केलं असल्यामुळे भाषणासाठी वेगळी तयारी करावी लागत नाही. मुलंही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होती. नवे विचार आणि नवी माहिती मुलांना आवडते. वाचन संस्कृतीला तात्पुरती मरगळ आली असली, तरी तिला धोका नाही, हे अशा कार्यक्रमांमध्ये दिसून येतं. आमचा समारंभ उरकल्यानंतर प्रा. हर्षल पाटील यांनी ‘नली’ नावाची एकांकिका सादर केली. लेखन त्यांचंच होतं. प्रयोग अतिशय सुंदर झाला. खेड्यामधलं विद्यार्थिदशेतलं प्रेम आणि त्याची विफलता, ‘नली’ची तिच्या संसारात होणारी फरपट आणि अखेर दारिद्र्यामुळे तिची आत्महत्या, हा वास्तवदर्शी, चटका लावणारा विषय होता.



कुठल्याही शैक्षणिक संस्थेच्या ग्रंथालयाला भेट देणं आवश्यक आणि महत्त्वाचं असतं. तिथल्या कर्मचाऱ्यांची तत्परता, तसंच शिक्षक-विद्यार्थ्यांची ‘साक्षरता’ त्यावरून समजते. म्हणून आम्ही तिकडे मोर्चा वळवला. आणि खरोखर सांगतो - तिथलं प्रशस्त, अद्ययावत सोयींनी परिपूर्ण, वाचकाभिमुख, उत्साही-मदतोत्सुक सेवकवर्ग असलेलं ग्रंथालय पाहून आम्ही थक्क झालो. काही विद्यापीठांचे अपवाद वगळता असं ग्रंथालय संपूर्ण महाराष्ट्रात आढळणार नाही. ‘गोवा सेंट्रल स्टेट लायब्ररी’चीच आठवण यावी, इतकं सुसज्ज. ग्रंथपाल डॉ. विजय श्रीनाथ कंची यांनी आमचं अगत्यपूर्वक स्वागत केलं. त्यांनी ‘तत्त्वज्ञान’ विषयात एमए, ग्रंथालयशास्त्राची उच्च पदवी आणि पीएचडी प्राप्त केलेली आहे. संपूर्ण ग्रंथालय त्यांनी स्वत: फिरून दाखवलं. इतका विद्वान आणि जागृत ग्रंथपाल असणं, हे संस्थेचं, तसंच विद्यार्थ्यांचं भाग्यच! तिथे इतके विभाग आहेत, की संपूर्ण फेरफटका मारायला एक दिवस पुरत नाही.

ग्रंथालयाचा आतील भाग

ललित पुस्तकांसह विज्ञान, तंत्रज्ञान आदी शेकडो विषयांवरची सुमारे पावणेदोन लाख पुस्तकं, त्यांचं पूर्ण संगणकीकरण, नियतकालिकं आणि त्यांचे खंड, झेरॉक्स, ऑडिओ-व्हिडिओची सोय, दुर्मीळ संदर्भग्रंथ आणि ज्ञानकोश, प्राचीन पोथ्या, तसंच ग्रंथांच्या जतनाची खास व्यवस्था, डिजिटायझेशन, उच्च दर्जाची ‘स्कॅनिंग’ यंत्रं, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रशस्त जागा, शिकवण्यासाठी, व्याख्यानांसाठी स्वतंत्र वर्ग. बाहेरच्या लोकांनाही ज्ञानरंजन ग्रंथालयाचं सदस्यत्व मिळू शकतं. अंध विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. तिथे ब्रेल लिपीमधली पुस्तकं उपलब्ध आहेत. बाहेर नेता न येणारे संदर्भ ग्रंथ आणि मौल्यवान पुस्तकांमध्ये एक प्रकारची ‘चिप’ बसवलेली आहे. ती बाहेर नेण्याचा प्रयत्न कोणी केल्यास ‘भोंगा’ वाजू लागतो. नवीन दाखल झालेल्या पुस्तकांची यादी बोर्डावर लागते. वेळोवेळी अभ्यासवर्ग, चर्चासत्रं, परिषदा होत असतात. ‘सीसीटीव्ही’ची नजर सगळीकडे आहेच. माजी किवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा वापर करता येतो. योग्य सूचनांचं तिथं स्वागत होतं. देश-परदेशातल्या मोठ्या ग्रंथालयांना संगणकाद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे. या वाचनालयाचं तपशीलवार वर्णन करायचं झाल्यास स्वतंत्र लेख लिहावा लागेल. हस्तलिखित संरक्षणाचं एक स्वतंत्र केंद्रही तिथं आहे.

राजे संभाजी नाट्यसंकुल

मुला-मुलींसाठी वसतिगृहांची स्वतंत्र सुंदर व्यवस्था आहे. तिथं शिस्त-नियमांचं काटेकोरपणे पालन होतं. पाहुण्यांसाठीही सुसज्ज खोल्या आहेत. सात्त्विक, चवदार नाश्ता-भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. आम्हीही त्याचा आवडीनं लाभ घेतला. महाविद्यालयाचा संपूर्ण परिसरच भारलेला, चैतन्यमय आहे. तिथं फिरताना ते प्रकर्षानं जाणवतं.

महाराष्ट्रातल्या नामवंत प्रकाशकांच्या हजारो पुस्तकांचं भव्य प्रदर्शन पाच दिवसांसाठी भरवण्यात आलं होतं. शहरातल्या ‘अथर्व पब्लिकेशन्स प्रा. लि.’ या संस्थेचे तरुण, धाडसी संचालक युवराज माळी यांनी त्याचं संपूर्ण संयोजन केलं होतं. ते पाहून झाल्यावर आम्ही पुढच्या कार्यक्रमाकडे रवाना झालो. पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्यात संवाद आणि प्रश्नोत्तरं, असं त्याचं स्वरूप होतं. ही ‘देवाण-घेवाण’ही सकाळसारखीच रंगली.

नर्सरी

कला-विज्ञानाच्या अभ्यासक्रमांबरोबच एम. जे. महाविद्यालयाने अनेक विस्तारित शाखा चालवलेल्या आहेत. प्राथमिक शाळेपासून ते नर्सरी, शिक्षणशास्त्र, इंजिनीअरिंग, विधी, मॅनेजमेंट, आयटी, क्रीडा संकुल, योगविद्या केंद्र, शारीरिक शिक्षण यांचा समावेश त्यात आहे. संशोधनपर, शैक्षणिक पुस्तकं छापण्यासाठी स्वत:चं प्रकाशनही आहे. नृत्य, नाट्य, संगीत आणि नर्सरीचेही स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत. हे संस्थेचं वैशिष्ट्य म्हणता येईल. संस्थेला ‘नॅक’द्वारा ‘अ’ दर्जा प्राप्त झालेला आहे. ‘यूजीसी’ने संस्थेला ‘कॉलेज ऑफ एक्सलन्स’ असं घोषित केलेलं आहे. तसंच, भारत सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने ‘स्टार कॉलेज’ असा गौरवही केला आहे.

नर्सरीसन १९४४मध्ये खानदेश एज्युकेशन सोसायटीची स्थापना होऊन एम. जे. कॉलेज सुरू झालं. संस्थापक अध्यक्ष होते (दिवंगत) अण्णासाहेब बेंडाळे. स्थानिक, तसंच मुंबईतले प्रसिद्ध व्यापारी शेट मूळजी जेठा यांनी दिलेल्या उदार देणगीतून सोसायटीनं २८ एकर जागा खरेदी केली. महाविद्यालयाच्या बांधकामासाठीही त्यांचीच मदत मिळाली. महाविद्यालयाचा हळूहळू विस्तार होत होत, आज त्याला विशाल वटवृक्षाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. शिक्षण आणि व्यवस्थापनाच्या श्रेष्ठ दर्जामुळे आजवर अनेक प्रकारचे सन्मान, तसंच ‘बिरुदं’ प्राप्त झालेली आहेत. स्वच्छ, पारदर्शी व्यवहार यांवर संस्थेचा कटाक्ष असतो. सर्व नेमणुका वशिल्याशिवाय आणि ‘देणगी’ न घेता होतात. 

पगार भरपूर असल्यामुळे, प्राध्यापकाच्या ‘निवडी’साठी सध्या जो काही ‘दर’ चालू आहे, तो ऐकला तर डोळे पांढरे होतील. हे उमेदवार काय शिकतात, काय शिकवणार आणि एवढे पैसे कुठून आणतात, हा गंभीर प्रश्न आहे. संस्थेच्या विकास-विस्ताराच्या नावाखाली सर्वत्र तीच ‘प्रथा’ आहे. ‘एमजे’मध्ये तसं घडत नाही. कोट्यवधी रुपयांवर ‘पाणी’ सोडलं जातं. ‘जंजीर’ सिनेमातलं ते वाक्य आहे ना – ‘वो पोलिस इन्स्पेक्टर बडा बदमाश है। पैसेही नही खाता!’ अशी परिस्थिती आहे. इथल्या संस्थेला मात्र ध्येयवादी, कर्तव्यदक्ष, मोठमोठी स्वप्नं बघणारं नेतृत्व लाभलेलं आहे.

अध्यक्ष - प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळेवर्तमान अध्यक्ष नंदकुमार तथा दादासाहेब बेंडाळे यांची सुमारे दोन तास झालेली भेट अविस्मरणीय ठरली. मुक्त वातावरणात एखाद्या संस्थेची इतकी भरभराट कशी होऊ शकते, याचं रहस्य त्या भेटीतून उलगडलं. त्यांनी प्रत्येक विभागाला Funds (Sanction) - आवश्यक तो वित्तपुरवठा, Facilities - सोयी-सुविधा, आणि Freedom - स्वातंत्र्य दिलेलं आहे. नवरात्रामुळे संपूर्ण, कडकडीत उपवास करत असूनही ते ताजेतवाने, तरतरीत दिसत होते. संस्थेबद्दल प्रचंड आत्मीयता, ‘नॉलेज’ इज पॉवर’ या ब्रीदवाक्याचा सदैव पाठपुरावा आणि त्यासाठी नवनवे उपक्रम - अभ्यासक्रम सुरू करण्याची तळमळ त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. 

ज्ञान आणि रोजगार संपादनासाठी वर्षानुवर्षं चालत आलेले ‘गुळगुळीत’ अभ्यासक्रम कुचकामी असून, भारताच्या प्राचीन शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. भारतीय विद्या आणि संस्कृती, १४ विद्या आणि ६४ कलांचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, असं त्यांचं मत आहे. त्यासाठी ५० लायक, कार्यक्षम व्यक्ती मिळाल्या, तर तसं परिवर्तन आणि क्रांतिकारक अंमलबजावणी करता येईल, असा विश्वा्स त्यांना आहे. त्यासाठीच ते अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या भेटीनं आम्हाला मनस्वी आनंद झाला.

तिथल्या मुक्कामात आणखी दोन-तीन ठिकाणी जाण्याचा योग आला. पहिलं ठिकाण म्हणजे शहरातलं १४२ वर्षांचं जुनं वल्लभदास वालजी (ववालय) जिल्हा वाचनालय. पूर्णपणे संगणकीकृत झालेल्या या ग्रंथालयात ई-बुक्सचाही स्वतंत्र विभाग आहे. आम्ही तिथं गेलो, त्याच दिवशी मुंबईच्या साहित्य अकादमीतर्फे ग्रंथ प्रदर्शनाची सुरुवात त्यांच्याच वास्तूत झाली. उद्घाटनाला आम्ही हजर होतो. शहराला भूषणास्पद ठरेल असं अतिभव्य ‘राजे संभाजी नाट्यसंकुल’ नुकतंच तयार झालेलं आहे. सुमारे ३५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या सुसज्ज वास्तूमध्ये १२०० आसनव्यवस्था असलेलं नाट्यगृह आहे. त्याशिवाय अनेक दालनं, मोठमोठ्या खोल्या तिथं उपलब्ध आहेत. त्याची व्यवस्था केशवस्मृती सेवासंस्था समूहाने सध्या स्वीकारलेली आहे. ते नाट्यगृहसुद्धा बघायला मिळालं.

सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे, त्या शयनयानातून अर्धवट गुंगीत, झोपेत स्वप्न बघत जो प्रवास सुरू झाला, त्याच अवस्थेत आम्ही दोन दिवस वावरत होतो. ते पाण्याखालचं ‘जलनगर’ नसून, भूतलावरचं ‘जळगाव’ होतं. हे समजायला तेवढा काळ जावा लागला. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक शिक्षणसंस्था पाहिलेल्या आहेत; परंतु जळगावचं ‘एम. जे. कॉलेज’ अत्यंत आगळंवेगळं, आदर्श स्वरूपाचं आहे. जगभर फिरूनही आपण या जागी आधी कसं आलो नाही, असा प्रश्न मला आणि श्यामरावांना पडला. २५-३० वर्षांपूर्वी तिथे गेलो असतो, तर कदाचित त्याच संस्थेच्या कार्यात सहभागी झालो असतो. पुणे-मुंबई सोडून तिकडेच स्थायिक झालो असतो.

‘इट इज नेव्हर टू लेट’ असं म्हणतात, त्याप्रमाणे (आहे त्या वयातही) अजूनही काही काम करण्याची संधी तिथे मिळाली, तर निश्चितच आवडेल. जगाच्या नकाशावर ही संस्था आपलं ‘अढळ’ स्थान निर्माण करील, हे निश्चित!

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZSICF
Similar Posts
राजनीती आणि राजव्यवहाराचे दिग्दर्शन करणारा चाणक्य आणि त्याचे अर्थशास्त्र ‘सगळे विरोधक जर आपापले मतभेद आणि शत्रुत्व विसरून एक होत असतील, तर त्या देशाचा राजा प्रामाणिक आहे, असे निश्चित समजावे.’ हे वाक्य आज सगळ्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्याचा प्रतिपादक आहे आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य. अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर चाणक्याच्या नावाची चर्चा होते; पण प्रत्यक्षात चाणक्याची
उडत्या तबकड्या (उत्तरार्ध) उडत्या तबकड्यांचे गूढ अद्याप उलगडलेले नाही, हे खरे असले, तरी त्यांच्या नोंदी मात्र बऱ्याच झाल्या आहेत. अनेक ठिकाणी अशा उडत्या तबकड्या दिसल्याचे अनुभव लोकांनी लिहून ठेवले आहेत. त्यावरून त्यांचा काही अभ्यास, वर्गीकरण करण्यात आले. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ सदरात आज उडत्या तबकड्यांच्या लेखाचा उत्तरार्ध
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
उपनिषदांचे अंतरंग (उत्तरार्ध) ‘किमया’ सदराच्या गेल्या आठवड्यातील भागात ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर यांनी पाच उपनिषदांची ओळख करून दिली. आजच्या लेखात आणखी काही उपनिषदांबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language